मंडळी, आज आपण बघणार आहोत जेष्ठ नागरिक बचत योजनेविषयी (Senior Citizen Saving Scheme) संपूर्ण माहिती ज्यात आपण बघणार आहोत; योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजासंबंधी माहिती, प्राप्तिकरात सूट मिळेल का? ही आणि अशीच अजून काही उपयुक्त माहिती.

Senior Citizens Savings Scheme 2025

जेष्ठ नागरिक बचत योजनेची वैशिष्ट्ये (Features of Senior Citizen Savings Scheme)

ही योजना खास जेष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे. जेष्ठ नागरिक बचत योजनेचं प्रमुख उद्दिष्ट जेष्ठ नागरिकांना बचतीबरोबरच पेंशन सुद्धा मिळवून देणं हे आहे. त्यामुळे हि योजना पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते.

तसंच पोस्टाची योजना असल्यामुळे या योजनेला सरकारी हमी सुद्धा मिळते. त्यामुळेच या योजनेत गुंतवणूक करण्याकडे जेष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांचा कल आढळतो.

जेष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत ५ वर्षांची आहे आणि योजनेचा व्याजदर ८.२% एवढा आहे. आणि योजनेत व्याज मिळताना दर तीन महिन्यांनी दिलं जातं.

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता (Senior Citizen Saving Scheme Eligibility)

  • या योजनेत फक्त भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारी व्यक्ती खातं उघडू शकते. अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत.
  • या योजनेत फक्त जेष्ठ नागरिक म्हणजे ६० वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती खात उघडू शकते.
  • सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी जे ५५ ते ६० वर्ष या वयोगटात येतात ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. हे कर्मचारी खाजगी किंवा सरकारी सेवेतील असले तरी चालतील. फक्त त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल.
  • सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी जे ५० ते ६० वर्ष या वयोगटात येतात ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. फक्त त्यांनाही सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल.
  • या योजनेत खाते वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीसाठी किंवा जोडीदाराबरोबर (म्हणजे पती/पत्नी बरोबर) संयुक्तपणेसुद्धा उघडले जाऊ शकते.
  • संयुक्त खात्यातील दुसऱ्या खातेदारासाठी वयाची कुठलीही अट नाही पण संयुक्त खात्यातील ठेवीची संपूर्ण रक्कम फक्त पहिल्या खातेदारालाच दिली जाईल.

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी ठेवींचे नियम (Senior Citizen Saving Scheme Deposit Rules)

  • या योजनेत किमान ठेव रु. १००० ठेवता येईल आणि १००० च्या पटीत रक्कम वाढवता येईल, म्हणजे १०००, २०००, ५०००, १०००० इत्यादी. पण ११००, १२०० अशी रक्कम ठेवता येणार नाही.
  • या योजनेत कमाल रकमेची मर्यादा ही एका व्यक्तीने उघडलेल्या सर्व खात्यांमध्ये मिळून एकूण जास्तीत जास्त ३० लाख रुपये आहे.
  • या योजेतील खात्यात कोणतीही जास्तीची ठेव ठेवल्यास, ठेवीदाराला जास्तीची रक्कम परत केली जाईल आणि जास्तीची रक्कम परत करेपर्यंत त्या जास्तीच्या रकमेवर बचत खात्याचा व्याजदर मिळेल. इथे जास्तीची रक्कम म्हणजे ३० लाखाहून जास्त पैसे भरले गेले तर ती रक्कम जास्तीची रक्कम धरली जाते.
  • या योजनेतील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०सी नुसार प्राप्तिकरात वार्षिक दीड लाखापर्यंत सवलतीसाठी पात्र ठरते.

जेष्ठ नागरिक बचत योजनेसाठी व्याजासंबंधी माहिती (Senior Citizen Saving Scheme Interest Rate)

  • या योजनेचा व्याजदर ८.२ टक्के आहे.
  • या योजनेत व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी ठेवीदाराला दिली जाईल आणि ही रक्कम ठेवीच्या तारखेपासून येणाऱ्या पहिल्या ३१ मार्च किंवा ३० जून किंवा ३० सप्टेंबर किंवा ३१ डिसेंबर या दिवशी मिळेल.
  • हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि ते योग्यवेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
  • त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार जेष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्याशी बचत खात जोडू शकतो ज्यामुळं आपोआप व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील.
  • जेष्ठ नागरिक बचत योजनेतील एका व्यक्तीच्या सर्व खात्यातील व्याज एका आर्थिक वर्षात रु. ५० हजारपेक्षा जास्त असल्यास त्यावर टीडीएस आकारला जाईल. पण फॉर्म १५जी किंवा १५एच भरल्यास टीडीएस कापला जाणार नाही.

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं मुदतीआधी बंद करणे (Senior Citizen Saving Scheme Premature Withdrawal)

  • या योजनेची मुदत ५ वर्षांची आहे तरीसुद्धा या योजनेत खातं कधीही बंद केलं जाऊ शकतं. पण त्याला काही नियम आहेत.
  • खातं १ वर्ष होण्यापूर्वी बंद केलं तर त्यावर कोणतंही व्याज दिले जाणार नाही आणि तोपर्यंत मिळालेली व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा केली जाईल.
  • खातं १ वर्षानंतर आणि २ वर्षापूर्वी बंद केल असल्यास, मूळ रकमेतून दीड टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल म्हणजे १० हजार रुपयांची ठेव असेल तर १५० रुपये वजा करून ९८५० रुपये परत दिले जातील.
  • खात २ वर्षानंतर आणि ५ वर्षापूर्वी बंद केले असल्यास मूळ रकमेतून १ टक्का रक्कम वजा केली जाईल म्हणजे १० हजार रुपयांची ठेव असेल तर १०० रुपये वजा करून ९९०० रुपये परत दिले जातील.
  • तसंच, मुदतवाढ केलेलं खात मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्षानंतर बंद केले जाऊ शकते आणि त्यावर कुठलीही कपात होणार नाही.

जेष्ठ नागरिक बचत योजना मुदतपूर्तीनंतर (Senior Citizen Saving Scheme After maturity)

  • खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षानंतर संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खाते बंद केले जाऊ शकते आणि खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतील
  • खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यूच्या तारखेपासून, खात्यावर बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल.
  • खातेधारकाचा मृत्यू झाला आणि पती/पत्नीचं संयुक्त खातं असेल किंवा हयात जोडीदार नॉमिनी असेल तर खाते मॅच्युरिटी होईपर्यंत चालू ठेवता येते. पण त्या बाबतीत दोन नियम आहेत
    १) हयात जोडीदार या योजनेत खात उघडण्यास पात्र असेल
    २) हयात जोडीदाराचे या योजनेत आधीच दुसरे नसेल तरचं खात चालू ठेवता येईल.

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं मुदतवाढ (Senior Citizen Saving Scheme Extension)

या योजनेत खात्याची मुदतवाढ करता येते. पण ही मुदतवाढ ३ वर्षांसाठी करता येते. त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपल्याला पासबुकसह अर्ज करावा लागतो.
याचे दोन नियम आहेत -

  • हा अर्ज मुदत पूर्ण होण्याआधी एक वर्षाच्या आत करावा लागतो.
  • विस्तारित किंवा मुदतवाढ केलेल्या खात्यावर मुदतपूर्तीच्या तारखेला जो व्याजदर असेल तो मिळेल.

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं प्राप्तिकरात सूट (Senior Citizen Saving Scheme Tax Benefit)

  • या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ८०सी नुसार दीड लाखापर्यंत सूट मिळते.
  • मात्र योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स स्लॅबप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागतो.
  • तसंच व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास टीडीएस (Tax Deducted at Source) कपात केली जाते.
  • टीडीएस (TDS) कपात टाळण्यासाठी फॉर्म १५एच भरून पोस्टात किंवा बँकेत जिथं तुमचं जेष्ठ नागरिक बचत योजनेत खातं असेल तिथं दिल्यास टीडीएस कपात टाळता येते. मात्र व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपेक्षा जास्त झाल्यास फॉर्म १५एच चा काहीही उपयोग होत नाही आणि टीडीएस कपात केलीच जाते.

जेष्ठ नागरिक बचत योजना खातं व्याजाची आकडेमोड

मंडळी, या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळत.

मुद्दल तिमाही व्याज
१०,००० २०५
५०,००० १,०२५
५,००,००० १०,२५०
१५,००,००० ३०,७५०
३०,००,००० ६१,५००

तर मंडळी, ही होती जेष्ठ नागरिक बचत योजनेची (Senior Citizen Saving Scheme) माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये जाऊ शकता. तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या.