आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या आवर्तक ठेव योजनेची (Post Office Recurring Deposit) संपूर्ण माहिती; ज्यामध्ये आपण बघणार आहोत गुंतवणुकीसाठी आवश्यक पात्रता, ठेवींचे नियम, नवीन व्याजदर आणि त्यानुसार किती व्याज मिळेल इत्यादी माहिती.

Post Office Recurring Deposit  in marathi

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेची वैशिष्ट्ये (Features of Post Office Recurring Deposit Scheme)

पोस्ट ऑफिस ची आवर्तक ठेव योजना ही खास करून अशा ठेवीदारांची आहे ज्यांना एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या मासिक हप्त्यांमधून एक मोठी रक्कम उभी करता यावी हाच या योजनेचा प्रमुख हेतू आहे.

या योजनेची मुदत ५ वर्षांची आहे. त्यामुळे या योजनेमध्ये खातं सुरु केल्यापासून पुढील ५ वर्ष ठेवीदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते. आणि ही ५ वर्षांची मुदत पूर्ण झाली कि मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेची पात्रता (Eligibility of Post Office Recurring Deposit)

  • या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
  • यात वयाची कुठलीही अट नाही.
  • फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते.
  • संयुक्त खात असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेसाठी ठेवींचे नियम (Rules of Deposit in Post Office Recurring Deposit)

  • या योजनेत खाते रोख रक्कम / चेकद्वारे उघडले जाऊ शकते आणि चेक दिला असेल पैसे जमा करण्याची तारीख ही चेक वटल्यावरची तारीख धरली जाईल.
  • या योजनेत दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागते.
  • या योजनेत आपण किमान ठेव रु. १०० ठेऊ शकतो आणि १० च्या पटीत रक्कम वाढवू शकतो. म्हणजे ११०, १२०, १५० अशा रकमा चालतात पण ११५, ११२ अशा रकमा चालत नाहीत. थोडक्यात, ज्या रकमेला १० नी पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम चालते.
  • यात कमाल रकमेची मर्यादा नाही. आपण जास्तीत जास्त कितीही पैसे दरमहा भरू शकतो.
  • या योजनेत खातेदाराने खातं महिन्याच्या १५ तारखेपर्यंत उघडल्यास, दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत भरावी लागेल.
  • जर खातेदाराने खातं महिन्याच्या १५ तारखेनंतर उघडल्यास, दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १६ तारखेपासून महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भरावी लागेल.
  • तसंच ठेवीदार एकावेळी अनेक आवर्तक ठेव खाती उघडू शकतो. त्याला कुठलीही मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेतील प्रलंबित रक्कम (Default in Post Office Recurring Deposit)

  • एखाद्या महिन्यात पैसे भरायला उशीर झाला तर दंड आकारला जातो आणि दंडाची रक्कम दर १०० रु मागे १ रुपया आहे.
  • तसंच, जर कोणत्याही आवर्तक खात्यामध्ये थकबाकी असेल तर, ठेवीदाराला प्रथम थकबाकी दंडाच्या रकमेसह भरावी लागेल आणि नंतर चालू महिन्याची रक्कम भरावी लागेल.
    उदा. तुम्ही दरमहा ५०० रुपये आवर्तक खात्यात भरत असाल आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी ५०० रु असेल तर त्यावर नियमाप्रमाणे ५ रुपये दंड म्हणजे ५०५ रुपये होतील आणि ऑक्टोबर महिन्याची रक्कम ५०० रु असे एकूण १००५ रुपये ऑक्टोबर महिन्यात भरावे लागतील.

    महिना दरमहा रक्कम दंड (१%) अंतिम रक्कम
    सप्टेंबर ५०० ५० ५०५
    ऑक्टोबर ५०० - ५००
    एकूण १००५


  • सलग ४ महिने पैसे भरायला उशीर झाल्यास खातं तात्पुरतं बंद होतं आणि त्यापुढील २ महिन्यांपर्यंत ते पुन्हा चालू करता येतं. मात्र या कालावधीत खाते पुन्हा चालू केले नाही तर खातं कायमस्वरूपी बंद होतं.
  • पैसे भरायला उशीर झालेल्या महिन्यांची संख्या ४ पेक्षा जास्त नसल्यास खातेदार त्या महिन्यांचे पैसे न भरता ठेवीची मुदत तेवढ्या महिन्यांनी वाढवून घेऊ शकतो आणि विस्तारित कालावधीत थकलेले हप्ते जमा करू शकतो.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेतील आगाऊ ठेव (Advance Deposit in Post Office Recurring Deposit)

  • या योजनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ठेवीदार या योजनेत दरमहा पैसे भरण्याऐवजी काही रक्कम आगाऊ सुद्धा भरू शकतो आणि अशी आगाऊ रक्कम भरल्यास त्यावर काही प्रमाणात सूट मिळते.
  • जर ठेवीदाराने किमान ६ महिन्यांची रक्कम आगाऊ भरली तर त्याला त्यातील एका महिन्याच्या रकमेवर १०% सूट मिळते आणि किमान १२ महिन्यांची रक्कम आगाऊ भरली तर त्यातील एका महिन्याच्या रकमेवर त्याला ४०% सूट मिळते.
    हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया -
    जर ठेवीदाराने दरमहा ५०० रु असे ६ महिन्यांचे ३००० रु आगाऊ भरले तर त्याला एक महिन्याच्या रकमेवर म्हणजे ५०० रु वर १०% म्हणजे ५० रु सूट मिळेल. म्हणजे त्याला ३००० रु ऐवजी २९५० रु भरावे लागतील.

    महिने आगाऊ रक्कम सूट अंतिम रक्कम
    ३,००० ५० २,९५०
    १२ ६,००० २०० ५,८००


  • तसेच ठेवीदाराने दरमहा ५०० रु असे १२ महिन्यांचे ६००० रु आगाऊ भरले तर त्याला एक महिन्याच्या रकमेवर म्हणजे ५०० रु वर ४०% म्हणजे २०० रु सूट मिळेल. म्हणजे त्याला ६००० रु ऐवजी ५८०० रु भरावे लागतील.
  • ही आगाऊ रक्कम खाते उघडताना किंवा योजनेचा कालावधी चालू असतानासुद्धा भरता येते.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेतील ठेवींवर कर्ज (Loan Facility in Post Office Recurring Deposit)

या योजनेअंतर्गत ठेवीदाराला कर्ज सुद्धा काढता येत. पण त्यासाठी काही अटी आहेत.

  1. पहिली अट म्हणजे 12 हप्ते जमा केल्यानंतर आणि खाते 1 वर्षासाठी चालू ठेवल्यानंतर म्हणजे त्या काळात खातं कुठल्याही कारणांनी बंद झालं नसेल म्हणजे पैसे भरायला उशीर झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी खात बंद झालं नसेल तर ठेवीदाराला खात्यातील शिल्लक रकमेच्या ५०% पर्यंत कर्ज मिळू शकत. म्हणजे ठेवीदाराने जेवढे हप्ते भरले असतील ती रक्कम आणि त्यावर मिळालेलं व्याज ही एकूण जेवढी रक्कम असेल त्याच्या ५०% एवढं कर्ज मिळू शकत.
  2. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये करता येते.
  3. कर्जावरील व्याजदर आवर्तक खात्याच्या व्याजदरापेक्षा २% जास्त लागू होईल. म्हणजे आत्ता आवर्तक खात्याचा व्याजदर ६.७% आहे तर कर्जासाठीचा व्याजदर ८.७% एवढा लागू होईल.
  4. ठेवीदाराने आवर्तक खात्यावर कर्ज काढल्यास ते ठेवीची मुदत संपायच्या आत फेडावं लागेल आणि कर्ज न फेडल्यास मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या रकमेतून उरलेली रक्कम वजा केली जाईल.
  5. आवर्तक ठेवीवर कर्ज काढण्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज करावा लागेल.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेत मुदतपूर्व खातं बंद करणे (Premature Withdrawal in Post Office Recurring Deposit)

  • या योजनेत खातं उघडल्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करून मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
  • पण या योजनेत खात मुदत पूर्ण होण्याआधी एक दिवस जरी बंद केलं तरी त्यावर बचत खात्याचा व्याजदर लागू होईल.
  • तसेच ठेवीदाराने काही रक्कम आगाऊ भरली असेल तर तो कालावधी पूर्ण होईपर्यंत खातं बंद करता येणार नाही.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेत मुदतपूर्तीनंतर (After Maturity in Post Office Recurring Deposit)

  • आवर्तक ठेवीची मुदत ५ वर्षांची आहे. त्यामुळे खात उघडून ५ वर्ष किंवा ६० महिने झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल.
  • ठेवीदाराला ठेवीची मुदत वाढवायची असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज देऊन आणखी ५ वर्षांसाठी मुदत वाढवता येईल आणि वाढीव मुदतीसाठी लागू होणारा व्याजदर मूळ खाते उघडताना असलेल्या व्याजदराएवढाच असेल.
  • मुदतवाढ केलेलं खाते विस्तारित कालावधी दरम्यान कधीही बंद केले जाऊ शकते. अशावेळी पूर्ण झालेल्या वर्षांसाठी, आवर्तक खात्याचा व्याजदर लागू होईल आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याज दर लागू होईल.
    उदा. जर ठेवीदाराने आवर्तक खात्याची मुदतवाढ घेतल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे (२ वर्ष ६ महिन्यांनी) खात बंद केलं तर त्या ठेवीवर पूर्ण झालेल्या २ वर्षांसाठी आवर्तक खात्याचा व्याजदर म्हणजे ६.७% व्याजदर मिळेल आणि पुढील ६ महिन्यांसाठी बचत खात्याचा म्हणजे ४% व्याजदर मिळेल.

    मुदत व्याजदर
    २ वर्षे ६.७%
    ६ महिने ४%


पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेत ठेवींवर मृत्यू लाभ (Death Benefit on Post Office Recurring Deposit)

आवर्तक योजनेतील खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खातेदाराचे नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अशा आवर्तक खात्याची शिल्लक रक्कम मिळविण्यासाठी दावा सादर करू शकतात. तसंच या दाव्याच्या मंजुरीनंतर, नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून मुदत पूर्ण होईपर्यंत आवर्तक खातं सुरू ठेवू शकतात.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेतील व्याजदर (Post Office Recurring Deposit Interest Rates)

या योजनेचा नवीन व्याजदर ६.७% आहे. आणि व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ आहे.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव व्याजाची आकडेमोड (Post Office Recurring Deposit Calculator)

व्याजदर ६.७% मुदत ५ वर्ष
दरमहा गुंतवणूक एकूण व्याज परतावा
१०० ६,००० १,१३७ ७,१३७
२०० १२,००० २,२७३ १४,२७३
५०० ३०,००० ५,६८३ ३५,६८३
१,५०० ९०,००० १७,०४९ १,०७,०४९
२,५०० १,५०,००० २८,४१५ १,७८,४१५

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेत आयकरात सूट (Post Office Recurring Deposit Tax Benefit)

  • या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर पोस्ट ऑफिसकडून टीडीएस कपात केली जात नाही.
  • मात्र या योजनेत मिळणार व्याज करपात्र आहे म्हणजे त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो.
  • तसंच या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर सुद्धा प्राप्तिकरात कुठलीही सवलत मिळत नाही.

पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Post Office Recurring Deposit Documents)

कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड आता अनिवार्य केलं आहे.
तसंच इतर कागदपत्रांमध्ये

  • खाते चालू करण्याचा अर्ज
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र (पासपोर्ट, वाहन चालवण्याचा लायसन्स)
  • पत्त्याचा पुरावा (वीजबिल, पासपोर्ट)
  • अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला.

ही कागदपत्र द्यावी लागतील.

तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या आवर्तक ठेव योजनेची (Post Office Recurring Deposit) माहिती. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया इतरांबरोबर शेअर करा म्हणजे इतरांनाही या योजनेचा फायदा मिळेल. धन्यवाद.