मंडळी, किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही भारत सरकारची एक प्रचलित योजना आहे जी पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना सुरुवातीला फक्त भारतातील म्हणजे भारतीय नागरिक असलेल्या शेतकरी बांधवांसाठी सुरु करण्यात आली होती म्हणून योजनेचं नाव किसान विकास पत्र ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली करण्यात आली.

Kisan Vikas Patra

किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये (Features of Kisan Vikas Patra)

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या योजनेत ठेवीदाराला एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागते आणि योजनेची मुदत संपली कि संबंधित ठेवीदाराला ठेवीची रक्कम खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजासकट परत दिली जाते.

मात्र या योजनेची मुदत निश्चित नसते कारण या योजनेत गुंतवलेली रक्कम जेव्हा दुप्पट होते तेव्हा योजनेची मुदत संपते. तसंच जसा व्याजदर बदलेल तशी ही मुदत सुद्धा बदलत जाते म्हणजे योजनेचा व्याजदर कमी झाला कि मुदत वाढते आणि व्याजदर वाढला कि मुदत कमी होते.

किसान विकास पत्र योजनेसाठी आवश्यक पात्रता (Kisan Vikas Patra Eligibility)

  • या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
  • संयुक्त खात असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं. तीन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती एका संयुक्त खात्यात भागीदार होऊ शकत नाहीत.
  • यात वयाची कुठलीही अट नाही. म्हणजे कुठल्याही वयाची व्यक्ती योजनेत खातं सुरु करू शकते.
  • फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते. आणि हे कायदेशीर पालक म्हणून आई किंवा वडील पात्र ठरतात.
  • या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे वयाची १० वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना स्वतः च्या नावावर किसान विकास पत्र योजनेत खातं सुरु करता येत आणि चालवता सुद्धा येतं म्हणजे खात्यातील सगळे व्यवहार करण्याची परवानगी त्या खातेदाराला दिली जाते.

किसान विकास पत्र योजनेसाठी ठेवींचे नियम (Kisan Vikas Patra Deposit Rules)

  • या योजनेत आपण किमान ठेव रु. १००० ठेऊ शकतो आणि १०० रु च्या पटीत रक्कम वाढवू शकतो. म्हणजे खातं सुरु करताना १०००, ११००, १२००, २१०० अशा रकमा चालतात. मात्र १२३०, ११४५, २०२२ अशा रकमा चालत नाहीत. थोडक्यात, अशी कुठलीही रक्कम जी १००० रु पेक्षा जास्त आहे आणि त्या रकमेला १०० ने भाग जातो ती रक्कम चालते.
  • यात कमाल रकमेची मर्यादा नाही. आपण जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतो.
  • तसंच या योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या नावाने कितीही खाती उघडली जाऊ शकतात. त्याला कुठलीही मर्यादा नाही.

किसान विकास पत्र मुदतपूर्तीनंतर (Pledging of Kisan Vikas Patra After Maturity)

  • या योजनेची मुदत पूर्ण होण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. या योजनेत जेव्हा ठेवीची रक्कम दुप्पट होते तेव्हा योजनेची मुदत संपते.
  • या योजनेचा चालू व्याजदर ७.५% असल्याने त्या हिशोबाने ठेवीची रक्कम दुप्पट होण्यासाठी ९ वर्ष ७ महिने लागतील. त्यामुळे ही मुदत संपल्यावर ठेवीदाराला पासबुकसह अर्ज सादर करून ठेवीची रक्कम आणि जमा व्याज परत मिळवता येईल.

किसान विकास पत्र मुदतपूर्तीनंतर खात्याचे तारण (Pledging of Kisan Vikas Patra)

मंडळी, किसान विकास पत्र गरज पडल्यास तारण ठेऊन त्यावर ठेवीदाराला कर्ज काढता येतं. तसंच कर्ज मिळवण्यासाठी हे खातं कधी कधी कर्ज देणाऱ्याच्या नावावर हस्तांतरित सुद्धा केलं जाऊ शकत. त्यासाठी ठेवीदाराला आधी कर्ज देणार्याकडून तशी सहमती असल्याचं पत्र आणावं लागतं आणि मग संबंधित अर्जासोबत पुरावा म्हणून जोडावं लागतं.

तसंच, ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येते किंवा सुरक्षेच्या कारणासाठी तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येते.
यामध्ये

  • भारताचे राष्ट्रपती/राज्याचे राज्यपाल.
  • रिझर्व बँक / शेड्युल्ड बँक / सहकारी संस्था / बँक.
  • सार्वजनिक/खाजगी/सरकारी कंपनी/स्थानिक प्राधिकरण.
  • गृहनिर्माण वित्त कंपनी इत्यादींचा समावेश होतो.

किसान विकास पत्र खाते मुदतपूर्व बंद करणे (Kisan Vikas Patra Premature Withdrawal)

  • या योजनेत खालील अटी वगळता मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येत नाही
  • पहिली अट, खातेधारकाचा मृत्यू झाल्यास म्हणजे एका व्यक्तीच खातं असेल एका खातेधारकाचा किंवा संयुक्त खातं असेल तर कोणत्याही एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं.
  • त्यानंतर जर ठेवीदाराने खात एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडे म्हणजे गॅझेटेड ऑफिसरकडे गहाण ठेवलं असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी ते काही कारणांनी जप्त केलं तर खातं बंद करता येतं.
  • किंवा जर न्यायालयानी खातं बंद करण्याचा आदेश दिला तर खातं बंद करता येतं.

खातं अडीच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्या खात्यावर बचत खात्याचा व्याजदर मिळतो.

खातं अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केलं तर योजनेचा चालू व्याजदर आणि कालावधी यांची आकडेमोड करून जी व्याजाची रक्कम असेल ती मूळ रकमेबरोबर दिली जाईल.

किसान विकास पत्र खात्याचे हस्तांतरण (Kisan Vikas Patra Transfer of Account)

  • या योजनेत खालील अटींवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते
  • खातेदाराचा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांच्या नावे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते
  • संयुक्त खात्यातील खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील इतर खातेदारांच्या नावे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • न्यायालयाच्या आदेशानुसार खातं हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • खातं तारण ठेवताना संबंधित तारणधारकाच्या नावे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते.

किसान विकास पत्र खात्यावर मृत्यू लाभ (Death Benefit on Kisan Vikas Patra)

  • एकल खात्याच्या ठेवीदाराचा किंवा संयुक्त खात्यातील सर्व ठेवीदारांच्या मृत्यू झाल्यास, खात्यातील रक्कम नॉमिनीला मिळते.
  • ज्या खात्यात तीन पेक्षा जास्त हयात नॉमिनी नसतील तर ते खातं तसच चालू ठेऊन मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रक्कम आणि व्याज मिळवण्याची सुविधा ते घेऊ शकतात.
  • अन्यथा खातं बंद करून त्या खात्यातील मूळ रक्कम जमा व्याजासह संबंधित नॉमिनीला परत केली जाईल.
  • संयुक्त खात्यातील एक किंवा दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यास हयात खातेदारांना त्या खात्याचा ताबा दिला जातो म्हणजे खात्यातील संपूर्ण रक्कम त्या हयात खातेदारांच्या नावे होते. तसंच खातं चालू ठेवणे किंवा बंद करण्याचे अधिकार त्या हयात खातेदारांच्या हातात राहतात.

किसान विकास पत्र व्याजदर (Kisan Vikas Patra Interest Rates)

  • मंडळी या योजनेचा चालू व्याजदर ७.५% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे. म्हणजे या योजनेत व्याजाची आकडेमोड वर्षभर एका रकमेवर होते आणि पुढील वर्षी आधीच्या वर्षीची रक्कम अधिक आधीच्या वर्षीचं व्याज मिळून होणाऱ्या रकमेवर व्याज मिळतं.
  • तसंच इतर योजनांप्रमाणे या योजनेसाठी किती व्याज आणि किती परतावा मिळेल हे दाखवता येत नाही कारण कितीही रक्कम असली तरी चालू व्याजदरानुसार ती ९ वर्ष ७ महिन्यातच दुप्पट होते. त्यामुळे जेवढी रक्कम तेवढंच व्याज असं सोप गणित इथे लागू होतं.

किसान विकास पत्र प्राप्तिकरात सूट (Kisan Vikas Patra Tax Benefit)

मंडळी, या योजनेत कुठल्याही प्रकारे प्राप्तिकरात सूट मिळत नाही. योजनेतील ठेवीची रक्कम आणि त्यावर मिळणार व्याज दोन्ही करपात्र आहे.

किसान विकास पत्र कागदपत्रं (Kisan Vikas Patra Documents)

किसान विकास पत्र योजनेत खातं चालू करण्यासाठी -

  • खाते चालू करण्याचा अर्ज
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)
  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीजबिल, पासपोर्ट)
  • अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला.

ही कागदपत्र द्यावी लागतील.

तर मंडळी ही होती किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या योजनेची माहिती. या योजनेत खात उघडण्यासाठी तुम्ही पोस्टात जाऊ शकता किंवा काही बँकांमध्ये उदा. युनियन बँक, बँक ऑफ बरोडा, ऍक्सिस बँक अशा बँकांमध्येसुद्धा खातं उघडता येतं. तेव्हा याचा लाभ नक्की घ्या. धन्यवाद.