SIP in Stock Market - मंडळी म्युच्युअल फंडात एसआयपी द्वारे गुंतवणूक करतात हे आपल्या सगळ्यांना माहीत असेल. पण अनेक जण थेट शेअर मार्केट मध्ये सुद्धा एसआयपी करतात आणि लाखो रुपये कमवतात. आज आपण शेअर्स मध्ये एसआयपी कशी करतात याविषयी माहिती घेणार आहोत.

SIP in Stock Market

म्युच्युअल फंडातील एसआयपी आणि स्टॉक किंवा शेअर्स मधली एसआयपी (SIP in Stock Market) यामध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडातील एसआयपी करताना गुंतवणूकदारांना फक्त पैसे भरण्याची गरज असते बाकी सगळी जबाबदारी म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर पार पाडतात. मात्र शेअर्स मधल्या एसआयपी मध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी गुंतवणूकदारालाच पार पाडाव्या लागतात.

जर तुम्हाला थेट शेअर मार्केटमध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काही निकषांचं पालन करावं लागतं ज्यामुळे तुमची मूळ गुंतवणूक सुरक्षित राहीलच आणि त्यातून मिळणारा परतावा सुद्धा वाढत राहील.

आजच्या लेखात आपण बघणार आहोत
१. शेअर्स मधली एसआयपी म्हणजे काय?
२. त्यासाठी शेअर्स निवडताना कुठली काळजी घ्यायची?

एसआयपी म्हणजे काय? (What is SIP)

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जी एक गुंतवणुकीची पद्धत आहे. ज्यामध्ये छोट्या छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता गुंतवणूकदाराला मिळते.

ही गुंतवणूक एका ठराविक तारखेला,

  • दर आठवड्याला
  • दर महिन्याला किंवा
  • दर तिन महिन्यांनी करता येऊ शकते.

तसेच काहीजण सहा महिन्यांनी एकदा किंवा वर्षातून एकदा सुद्धा एसआयपी करतात. यामध्ये तुम्ही एकदा तारीख ठरवली की तीच तारीख शेवटपर्यंत ठेवावी लागते, ती बदलून चालत नाही. ही तारीख सारखी सारखी बदलल्यास तुम्हाला एसआयपी चा म्हणावा तसा फायदा मिळत नाही

सामान्यपणे गुंतवणूकदार महिन्याच्या एक ते दहा तारखेपर्यंत एसआयपी मध्ये पैसे भरतात कारण त्यानंतर तोपर्यंत पैसे खर्च होण्याची शक्यता असते आणि एसआयपी ची गुंतवणूक राहून जाण्याची शक्यता असते

एसआयपी मध्ये गुंतवणूक का करावी? (Why to do SIP in Stock Market)

१. अनेकांकडे एक रकमी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसते त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना एसआयपी द्वारे गुंतवणूक करणे सोपं जातं. त्यामुळे छोट्या छोट्या हप्त्यांमधून का होईना पण गुंतवणूक केलीच पाहिजे अन्यथा तुमचे सगळे पैसे खर्च होऊन जातील.

त्यामुळे अनावश्यक खर्च करण्याची ही सवय बदलून चांगल्या गुंतवणुकीची सवय लावण्यासाठी एसआयपी चा उपयोग होतो आणि छोट्या छोट्या हप्त्यांमधून भविष्यात एक मोठी रक्कम उभी करण्यासाठी सुद्धा एसआयपी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.

तसंच मागील दहा वर्षांच्या डेटानुसार एसआयपी मधून आपल्याला १२ ते १५ टक्के परतावा मिळतो असं दिसून येतं. त्यामुळे जर तुम्ही महिना एक हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवले तर

वर्षे गुंतवणूक परतावा एकूण रक्कम
10 120000 112339 232339
20 240000 759148 999148
30 360000 3169914 3529914
40 480000 11402420 11882420

इथं तुम्ही बघू शकता की जेवढ्या जास्त कालावधीसाठी तुमची गुंतवणूक तेवढा तुमचा परतावा पटींमध्ये वाढत जातो तो सुद्धा दरमहा एका ठराविक तारखेला फक्त एक हजार रुपये भरून.

थोडक्यात तुम्ही जेवढी कमी वयात गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळेल आणि तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवू शकाल. याच प्रकाराला गणिती भाषेत चक्रवाढ असे म्हणतात.

२. एसआयपी (SIP in Stock Market) मध्ये गुंतवणूक करण्याचे दुसरे कारण म्हणजे रुपी कॉस्ट एवरेजिंग.

शेअर्स खरेदी करण्याचा एक सोपं गणित आहे जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा खरेदी करायची आणि जेव्हा शेअर बाजार वाढतो तेव्हा विक्री करायची. तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करताना एक अजून नियम असतो तो म्हणजे मार्केट जेव्हा वाढलेलं असतं तेव्हा कमी खरेदी करायची आणि मार्केट जेव्हा घसरतं तेव्हा जास्त खरेदी करायची.

सामान्यपणे शेअर बाजारातील तज्ञ हाच नियम वापरून खरेदी किंवा विक्री करतात आणि लाखो रुपये कमवतात.

मात्र सामान्य माणसासाठी शेअर मार्केटकडे एवढं लक्ष ठेवणं अशक्य असतं कारण त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढून सतत शेअर मार्केटकडे लक्ष ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एसआयपी हा पर्याय अतिशय चांगला आहे कारण एसआयपी मध्ये मगाशी सांगितलेला नियम म्हणजे शेअर बाजार वधारेल तेव्हा कमी खरेदी करणे आणि शेअर बाजार घसरेल तेव्हा जास्त खरेदी करणे आपोआपच पाळला केला जातो कारण एसआयपी मध्ये जी खरेदी केली जाते त्याची खरेदीची रक्कम नेहमी एकच राहते म्हणजे समान राहते त्यात बदल होत नाही.

एसआयपी - ५,००० रु
शेअरची किंमत शेअर्स
२५० २०
५०० १०
१०००
२५००

याचं उदाहरण म्हणून आता आपल्यासमोर तक्ता दिसत आहे त्यात आपण बघू शकता जर

तुम्ही दरमहा ५,००० रुपये एसआयपी एका ठराविक शेअर मध्ये करत आहात आणि जेव्हा त्या शेअर चा भाव वाढेल तेव्हा आपोआपच कमी शेअर्स खरेदी केले जातील आणि शेअर चा भाव कमी होईल तेव्हा आपोआपच जास्त खरेदी केली जाईल कारण आपली गुंतवणुकीची रक्कम दरमहा समान त्यात कुठलाही बदल होत नाही त्यामुळे त्या रकमेत जेवढे शेअर्स येतील तेवढेच खरेदी केले जातील यालाच रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग असं म्हणतात म्हणूनच नोकरदार किंवा व्यावसायिक ज्यांना सतत शेअर मार्केटकडे लक्ष ठेवता येत नाही त्यांच्यासाठी एसआयपी ही अतिशय सोयीची गुंतवणूक आहे

मगाशी आपण बघितलं की जर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी केली तर तुम्हाला फक्त पैसे गुंतवावे लागतात पुढच्या सगळ्या गोष्टींची काळजी म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर घेतात. मात्र जेव्हा तुम्ही स्वतःच थेट शेअर बाजारात गुंतवणूक करता (SIP in Stock Market) तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःच कराव्या लागतात तसंच गुंतवणूक एसआयपी मध्ये करायचे असेल तर ती दीर्घकाळासाठी करावी लागते त्यामुळे तेवढ्या कालावधीसाठी आपली गुंतवणूक तर सुरक्षित राहिलीच पाहिजे पण आपल्याला परतावा सुद्धा जास्तीत जास्त मिळवता आला पाहिजे हा उद्देश एसआयपी चा असतो.

त्यामुळे आपला पहिला मुद्दा आहे

१. शेअर्स निवडणे किंवा शेअर बाजारातील कंपनी निवडणे.

गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना -

  • ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असावी.
  • ती कंपनी मार्केटचं नेतृत्व करणारी किंवा ठराविक सेक्टरमध्ये प्रमुख कंपनी असावी.
  • कंपनीचा व्यवसाय आणि फायदा नियमित वाढणारा असावा
  • किमान पाच वर्षांसाठी तरी कंपनीच्या नावावर एक तर कर्जच नसावं किंवा असलं तर ते अगदी कमीत कमी असावं
  • कंपनीचा प्रती शेअर परतावा हा त्या सेक्टरमधील इतर कंपन्यांपेक्षा जास्त असावा आणि किमान ३ वर्षे नियमित असावा

सामान्यपणे अशा कंपन्या नामांकित कंपन्या असतात ज्यांच्याविषयी आपण नेहमी वाचत किंवा ऐकत असतो किंवा त्यांची उत्पादन नियमित वापरत सुद्धा असतो

उदाहरणार्थ -

  • टाटा मोटर्स ज्यांच्या गाड्या आपण वापरतो किंवा इतरांना वापरताना बघतो
  • ITC ची उत्पादन आपण आपल्या आयुष्यात नियमित वापरतो उदा. नूडल्स
  • आयटी क्षेत्रातील इन्फोसिस हे नाव आपण नियमित वृत्तपत्र किंवा टीव्हीवरील बातम्यांमध्ये ऐकत असतो
  • स्टेट बँक किंवा एचडीएफसी बँक ज्यामध्ये आपण आपले पैसे ठेवतो किंवा त्यांच्या योजनांमध्ये आपण गुंतवणूक करतो

त्यामुळे आपण नीट शोधलं तर आपल्याला असे अनेक ब्रँड्स किंवा कंपन्या दिसतील जे आपण दैनंदिन आयुष्यात वापरतो आणि जे चांगल्या प्रतीचे आहेत तसेच आपण आत्ता जे निकष बघितले त्यामध्ये सुद्धा त्या कंपन्या बसतात.

शेअर्समध्ये एसआयपी करण्यासाठी आपल्याला किमान किती कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत (Minimum number of companies you need to invest in to do SIP in Stock Market)

शेअर्समध्ये एसआयपी करण्यासाठी आपल्याला सामान्यपणे किमान दहा कंपन्यांमध्ये तरी पैसे गुंतवले पाहिजेत या दहा कंपन्या निवडताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका सेक्टर मधल्या जास्तीत जास्त दोन कंपन्या आपण निवडू शकतो त्यापेक्षा जास्त नाही आणि ज्या सेक्टर मधील कंपन्या आपण निवडतो तो सेक्टर भविष्यामध्ये चांगली वाढ होणारा असला पाहिजे.

उदाहरणार्थ - बँकिंग सेक्टर किंवा ऑटोमोबाईल कंपन्या ज्या इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करतात कारण आपण एसआयपी लॉंग टर्म साठी करणार आहोत आणि जर आपण निवडलेल्या कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य नसतील तर आपल्या गुंतवणुकीला भविष्यात काहीच अर्थ राहणार नाही

तसंच वेगवेगळ्या १० कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं अजून एक कारण सुद्धा आहे की भविष्यात एखादा कंपनीला काही कारणानी नुकसान झालं किंवा एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव अचानक कोसळला तर बाकीच्या कंपन्यांमधली गुंतवणूक आपल्याला त्या नुकसानीपासून वाचवेल तसेच एका सेक्टर मध्ये दोन पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे कारण सुद्धा तेच आहे की एखादा सेक्टर काही कारणांनी अचानक कोसळला तर बाकीच्या सेक्टरमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला त्या नुकसानी पासून वाचू शकेल.

शेअर्समध्ये एसआयपी करण्यासाठी कशा प्रकारच्या कंपन्या निवडायच्या (What type of companies to choose for SIP in Stock Market)

सामान्यपणे कंपन्या तीन प्रकारच्या असतात - लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप.

  • लार्ज-कॅप कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांचे भांडवल २०,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे. अशा कंपन्या त्यांच्या व्यवसायात चांगल्या प्रकारे सुस्थापित झालेल्या असतात आणि फंडामेंटली अतिशय स्ट्रॉंग असतात. त्यांचा व्यवसायातील आलेख चढत्या क्रमाचा असतो.
  • मिड-कॅप कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांचे भांडवल ५,००० कोटी ते २०,००० कोटी रुपयांदरम्यान कमी आहे. अशा कंपन्या त्यांच्या व्यवसायात प्रकारे सुस्थापित झालेल्या असतात पण त्यांचा व्यवसायातील आलेख लार्ज-कॅप कंपनी सारखा नसतो. त्यांना व्यवसायात बर्याचदा चढ उतार अनुभवायला मिळतो.
  • स्मॉल-कॅप कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांचे भांडवल ५,००० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्या आकाराने तुलनेने लहान असतात पण त्याच्यात लक्षणीय वाढीची क्षमता असते. तरीसुद्धा अशा कंपन्यांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकतं.

त्यामुळे पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्यपणे ६० ते ७० टक्के कंपन्या या लार्ज कॅप मधल्या निवडाव्यात आणि उरलेल्या ३० ते ४० टक्के कंपन्या मिडकॅप मधल्या निवडाव्यात.

मिडकॅप मधल्या कंपन्या निवडताना सुद्धा शक्यतो त्या मार्केटमधल्या लीडिंग कंपन्या असाव्यात ज्या अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असतात अशामुळे त्या लॉंग टर्म गुंतवणुकीत चांगला परतावा देतील कारण त्या कंपनीची ग्रोथ आधीच चांगल्या प्रकारे झालेली असते आणि मार्केटमध्ये त्यांचं नावही चांगलं झालेलं असतं.

चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी शक्यतो स्मॉल कॅप कंपन्या निवडू नयेत आणि पेनी स्टॉक पासून तर दूरच राहावं कारण पेनी स्टॉक्स हे आधीच खूप नुकसानीत असतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते अतिशय अयोग्य ठरतात.

तरीसुद्धा तुम्हाला एखादी स्मॉल कॅप कंपनी तितकीच योग्य वाटत असेल तर त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यानंतरच त्याच्यात पोर्टफोलिओच्या जास्तीत जास्त दहा टक्के पर्यंतच गुंतवणूक करा पण पेनी स्टॉक्स पासून मात्र १००% दूर रहा. पेनी स्टॉक्स लॉन्ग टर्म साठी अतिशय अयोग्य असतात

स्टॉक मार्केटमध्ये एसआयपीची शेवटपर्यंत तीच तारीख ठेवा (Keep the same date till the end of the SIP in Stock Market)

एसआयपीची सुरूवात करताना जी तारीख तुम्ही पहिल्यांदा ठरवलेली असते तीच शेवटपर्यंत ठेवावी. त्याच दिवशी दरमहा पैसे एसआयपी मध्ये भरावे जेणेकरून तुम्हाला एसआयपी चा संपूर्ण लाभ घेता येईल.

समजा तुम्ही निवडलेल्या तारखेच्या दिवशी शेअर बाजारात एखादी सुट्टी आली तर त्याच्या पुढच्या कामकाजाच्या दिवशी एसआयपी साठी शेअर्स खरेदी करावे.

उदाहरणार्थ - तुम्ही एक तारीख निवडली आहे पण एक तारखेला एखादी सुट्टी आली तर तुम्ही दोन तारखेला तुमच्या एसआयपी साठी शेअर्स खरेदी करू शकता तसेच एक आणि दोन तारखेला सुद्धा सुट्टी आली तर पुढचा कामकाजाचा दिवस म्हणजे तीन तारखेला तुम्ही शेअर्सची खरेदी करू शकता.

एखाद्या शेअरचा भाव प्रमाणाबाहेर वाढला तर काय करावं?

उदाहरणार्थ - सुरुवातीला आपण एखादा शेअर पाचशे रुपयाला एक या भावाने खरेदी करत असू आणि काही वर्षांनी तो शेअर दहा हजार रुपये झाला तर तो शेअर एसआयपी द्वारे खरेदी करणे अवघड आहे. अशावेळी त्या शेअर्समध्ये दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते. बोनस किंवा स्प्लिट ज्यामुळे त्या शेअरचा भाव आपोआपच कमी होतो.

पण तसं न झाल्यास त्या शेअरची खरेदी थांबवून त्याच सेक्टर मधला तशाच प्रकारचा दुसरा शेअर तुम्ही एसआयपी साठी खरेदी करू शकता. मात्र नवीन शेअर खरेदी करण्यापूर्वी त्याचा पूर्णपणे अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे.

तर मंडळी हे होते शेअर्समध्ये एसआयपी द्वारे (SIP in Stock Market) गुंतवणूक करण्यासाठीचे काही निकष जे कुठल्याही गुंतवणूकदाराला न चुकता पाळलेच पाहिजेत. ज्यामुळे त्यांची गुंतवणूकता सुरक्षित राहीलच पण परतावा सुद्धा चांगला मिळेल. तेव्हा हे निकष पुन्हा एकदा नीट समजून घ्या. धन्यवाद.