एक १८ वर्षाची व्यक्ती दर महिन्याला फक्त २१० रु भरून त्याच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला किमान ५००० रु पेन्शन म्हणून मिळवू शकते.
आज आपण बघणार आहोत याच अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती ज्यामध्ये या योजनेची वैशिष्टये, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि दर महिन्याला किती रक्कम भरली कि किती पेंशन मिळेल याची माहिती बघणार आहोत. तर सुरु करूया आजचा व्हिडिओ.
अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) - पात्रता निकष
- सर्वप्रथम खातेदार भारतीय नागरिक असावा.
- तसंच या योजनेत वयाची १८ वर्ष पूर्ण झालेली पण ४० पेक्षा कमी वय असलेली कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. मात्र वयाची ४० वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
- ही योजना खासकरून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. उदा. घरकाम करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती, मजुरी करणारी व्यक्ती, हॉटेल मध्ये काम करणारी व्यक्ती, रस्त्यावरील विक्रेते किंवा अशाच प्रकारची कामं करणारी व्यक्ती या योजनेत नाव नोंदणी करू शकते.
- मात्र,जी व्यक्ती इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्तिकर भरत असेल अशा व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत.
Atal Pension Scheme - खातं सुरु कसं करायचं?
मंडळी, अटल पेन्शन योजनेत खातं सुरु करण्यासाठी- तुमचं एखाद्या बँकेत किंवा पोस्टात बचत खातं असावं लागतं.
- तसंच त्या बचत खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे म्हणजे जोडलेलं असलं पाहिजे.
- तसंच तुमचा फोन नंबर आधार आणि बँक खात्याबरोबर जोडला गेला असला पाहिजे.
खातं सुरू करण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेत जाऊन Atal Pension scheme मध्ये खातं सुरु करण्यासाठीचा फॉर्म भरून दिला म्हणजे तुमचं खातं सुरु होतं आणि तुमच्या खात्यातून अटल पेन्शन योजनेसाठीचा हप्ता ट्रान्सफर केला जातो. फक्त तुम्ही तुमच्या बचत खात्यात त्या हप्त्याच्या रकमेएवढी रक्कम ठेवणं आवश्यक आहे.
तसंच पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किमान २० वर्ष तरी पैसे भरावेत लागतील. उदा. जर तुम्ही ३० व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत नावनोंदणी केली तर तुम्हाला पुढील २० वर्ष म्हणजे तुमच्या वयाच्या ५० वर्षांपर्यंत अटल पेन्शन योजनेत नियमितपणे पैसे भरावे लागतील.
Atal Pension Scheme - नियमित पैसे न भरल्यास?
अटल पेन्शन योजनेत (APY) जर एखाद्या खातेदाराने पैसे नियमित भरले नाही तर- खाते ६ महिन्यांनंतर गोठवले जाऊ शकते,
- १२ महिन्यांनंतर निष्क्रिय केले जाऊ शकते आणि
- २४ महिन्यांनंतर बंद केले जाऊ शकते.
Atal Pension Scheme - डेथ क्लेम
मंडळी जर खातेदार विवाहित असेल, तर त्याचा जोडीदार म्हणजे पती/पत्नी हा डिफॉल्ट नॉमिनी असतो म्हणजे काय तर खातेदाराचा मृत्यू झाला तर पेन्शन च्या रकमेवर जोडीदाराचा म्हणजे पती/पत्नी चा पहिला अधिकार असतो आणि जर खातेदाराचा त्याच्या वयाची ६० वर्ष पूर्ण होण्याआधी मृत्यू झाला तर, जोडीदाराला म्हणजे पती/पत्नीला त्यांच्या मृत्यूपर्यंत पेन्शनची रक्कम मिळत राहील. मात्र खातेदार आणि त्याचा जोडीदार म्हणजे पती/पत्नी दोघांच्याही मृत्यूनंतर, नॉमिनीला जमा झालेली पेन्शन रक्कम मिळेल.Atal Pension Scheme - खातं सुरु केल्यावर किती हप्ता भरावा लागतो?
मंडळी, Atal Pension Scheme मध्ये १ हजार, २ हजार, ३ हजार, ४ हजार, ५ हजार अशा वेगवेगळ्या रकमांची पेन्शन मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वयाच्या ६० वर्षानंतर किती पेन्शन हवी आहे त्यावर ही दरमहा हप्त्याची रक्कम ठरवली जाते. तसंच, तुमचं वय किती आहे त्यावर सुद्धा दरमहा हप्त्याची रक्कम ठरवली जाते.Atal Pension Scheme - १८ वर्षाचा खातेदार
मंडळी, खातेदाराचं वय १८ वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला १ हजार रु पेन्शन हवी असेल तर दरमहा ४२ रु भरावे लागतील. भरावे लागतील म्हणजे खात्यातून ऑटो डेबिट द्वारे घेतले जातील.याबाबतीत जर तुम्ही दर तीन महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर १२५ रु दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील आणि जर तुम्ही दर सहा महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर २४८ रु दर ६ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील.
Atal Pension Scheme - २५ वर्षाचा खातेदार
जर खातेदाराचं वय २५ वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला १ हजार रु पेन्शन हवी असेल तर दरमहा ७६ रु खात्यातून ऑटो डेबिट द्वारे घेतले जातील.याबाबतीत जर तुम्ही दर तीन महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर २२६ रु दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील आणि जर तुम्ही दर सहा महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर ४४९ रु दर ६ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील.
अशा प्रकारे तुमच्या वयानुसार आणि पेन्शन च्या रकमेनुसार हप्ता कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यासाठी आपण अजून एक उदा बघूया.
Atal Pension Scheme - ३९ वर्षाचा खातेदार
त्यामुळे खातेदाराचं वय ३९ वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला १ हजार रु पेन्शन हवी असेल तर दरमहा २६४ रु खात्यातून ऑटो डेबिट द्वारे घेतले जातील.याबाबतीत जर तुम्ही दर तीन महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर ७८७ रु दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील आणि जर तुम्ही दर सहा महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर १५५८ रु दर ६ महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील.
तर अशा प्रकारे पेन्शनची रक्कम आणि खातेदाराचं वय या दोन्ही नुसार दरमहा, दर तिमाहीला किंवा दर सहा महिन्यांनी पैसे बचत खात्यातून कापून घेतले जातात.
तुम्हाला वेगवेगळ्या वयासाठी आणि वेगवेगळ्या पेन्शन च्या रकमांसाठी किती हप्ता द्यावा लागेल हे बघायचं असेल तर त्याची माहिती देणाऱ्या चार्टची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो चार्ट बघू शकता.
अटल पेन्शन योजना हप्त्याचा चार्ट -
https://www.npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Subscribers_Contribution_Chart_1.pdf
Atal Pension Scheme चे फायदे काय काय आहेत?
- ही सरकारी योजना आहे. त्यामुळे पेन्शनची हमी मिळते.
- दुसरी गोष्ट म्हणजे हप्ता अतिशय कमी आहे त्यामुळे अगदी कमीत कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकतात.
- तसेच वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर पैशांची चिंता शिल्लक राहणार नाही कारण दरमहा पेन्शन मिळायला सुरुवात होईल.
Atal Pension Scheme कागद्पत्र
अटल पेन्शन योजनेत खातं सुरु करायला- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट)
- बँकेची माहिती देण्यासाठी बँकेचं पासबुक
- अटल पेन्शन योजनेत खातं सुरु करण्याचा फॉर्म भरून द्यावा लागेल
- आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
- तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असला पाहिजे.
- आधार क्रमांकाशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला असला पाहिजे
- तो मोबाईल क्रमांक चालू असला पाहिजे. बंद केलेला किंवा इनॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक चालत नाही.
Atal Pension Scheme मध्ये मुदतीपूर्वी खातं बंद करता येईल का?
मंडळी, त्यासाठी दोन नियम आहेत -- जर खातेदाराचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं
- खातेदाराला काही असाध्य आजार झाला असेल आणि त्यावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज लागली तर खातं बंद करता येईल.
0 Comments