नमस्कार मंडळी, आपलं उत्पन्न करमुक्त करण्यासाठी नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी चा उपयोग करून आपण प्राप्तिकराच्या रकमेत अक्षरशः लाखो रुपयांची बचत करू शकतो.
आपण बघणार आहोत याच नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी ज्यांचा वापर करून आपण प्रप्तिकरात कशाप्रकारे बचत करू शकतो?
मंडळी, आपल्या उत्पन्नाचे एकूण पाच प्रकार प्राप्तिकर खात्याने ठरवलेले आहेत.
  • Income From Salary म्हणजे पगारातुन मिळणारं उत्पन्न
  • Income From House Property म्हणजे घरभाड्यातून वगैरे मिळणारं उत्पन्न
  • Income From Business and Profession म्हणजे व्यवसायातून मिळणारं उत्पन्न
  • Income From Capital Gain म्हणजे स्वतःच्या मालकीची मालमत्ता विकून मिळालेलं उत्पन्न यामध्ये जमीन, घर, सोनं, चांदी, शेअर्स इत्यादींचा समावेश होतो
  • Income From Other Sources म्हणजे वरील चार प्रकारांशिवाय इतर कुठल्याही मार्गाने मिळवलेलं उत्पन्न
हे आहेत उत्पन्नाचे एकूण पाच प्रकार. यामधल्या ज्या मार्गाने आपल्याला उत्पन्न मिळत असेल त्या एका किंवा सर्व उत्पन्नाची बेरीज केल्यावर आपल्याला आपलं एकूण करपात्र उत्पन्न मिळतं.
प्राप्तिकराची आकडेमोड करताना आधी या पाच प्रकारच्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागतो आणि मग त्यातून अनेक प्रकारच्या सवलती आणि वजावटींची रक्कम कमी केली कि आपलं एकूण करपात्र उत्पन्न अजून कमी होतं आणि मग उरतं निव्वळ करपात्र उत्पन्न ज्यावर प्राप्तिकराची आकडेमोड टॅक्स स्लॅबनुसार केली जाते आणि त्यानंतर जो काही प्राप्तिकर होईल तो आपल्याला भरावा लागतो.  

आपलं उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करमुक्त कसं होईल?

आपलं उत्पन्न करमुक्त करण्यासाठी आपण नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी चा उपयोग करून आपल्या उत्पन्नाची रक्कम एका मर्यादेच्या खाली आणू शकतो. ही मर्यादा प्राप्तिकर विभागानेच दिली आहे.
ही मर्यादा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७ लाख होती आणि आता या वर्षीपासून म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून १२ लाख करण्यात आली आहे. तर या मर्यादेपेक्षा कमी आपल्या उत्पन्नाची रक्कम झाली म्हणजे आपलं उत्पन्न करमुक्त होतं.

आर्थिक वर्ष  करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 
२०२४-२५ ७ लाख रु
२०२५-२६ १२ लाख रु
 

उदा.
समजा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये म्हणजे मागील आर्थिक वर्षात तुमचं उत्पन्न ८ लाख रु आहेत. तर हे उत्पन्न करमुक्त करण्यासाठी तुम्हाला नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी वापरून त्यातले १ लाख रु कमी करावे लागतील म्हणजे तुमचं उत्पन्न ७ लाख होईल आणि त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही म्हणजेच तुमचं ते उत्पन्न करमुक्त होईल.

आर्थिक वर्ष २०२४-२५
वार्षिक उत्पन्न ८,००,०००
सवलती + वजावटी (-) १,००,०००
करपात्र उत्पन्न ७,००,०००


तर आता आपण बघूया कि नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या या सवलती आणि वजावटी काय काय आहेत?
 

नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी

पगाराच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या सवलती

मंडळी, नोकरी करणाऱ्या करदात्यांना जे काही वेगवेगळे भत्ते मिळतात त्यातील काही भत्त्यांवर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. आता आपण बघूया कुठकुठल्या भत्त्यांवर ही सवलत दिली जाते.

१) दिव्यांग व्यक्तींना मिळणारा वाहतूक भत्ता

मंडळी, एखादी दिव्यांग व्यक्ती जी नोकरी करत असेल आणि कंपनीकडून त्यांना जर वाहतूक भत्ता मिळत असेल तर त्या रकमेवर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते.

२) कन्व्हेयन्स अलाउन्स

मंडळी, अनेकदा ऑफिस कडून कर्मचाऱ्यांना ऑफिस ला येण्याजाण्याचा खर्च सुद्धा दिला जातो. तर त्यावर सुद्धा प्राप्तिकरात नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते.

३) डेली अलाउन्स

आता अनेकदा ऑफिसच्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जावं लागतं. तर अशा वेळी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना काही प्रकारचे भत्ते दिले जातात त्याला डेली अलाउन्स म्हणतात. यामध्ये बोर्डिंग किंवा राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च इत्यादी दिला जातो. तर त्यावर सुद्धा प्राप्तिकरात नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते.
उदा.
समजा तुम्हाला तुमची कंपनी तुम्हाला पुण्याहून बेंगलोरला कामानिमित्त पाठवते तर अशावेळी कंपनीकडून हे भत्ते तुम्हाला दिले जातात ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.

४) टूर आणि ट्रांसफर अलाउन्स

मंडळी, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली होते. त्यांना कुटुंबासकट संबंधित बदलीच्या गावी जावं लागतं. तर अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून या प्रकारचे अलाउन्स दिले जातात ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.

५) परक्विझिट्सफॉर ऑफिसिअल पर्पज

मंडळी, अनेकदा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सोयी दिल्या जातात ज्यामध्ये प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था केली जाते, पेट्रोलचा खर्च दिला जातो, मेडिकल फॅसिलिटीज दिल्या जातात, कर्मचाऱ्यांना कामानिमित्त परगावी जावं लागलं तर राहण्याची व्यवस्था केली जाते या सगळ्याला परक्विझिट्स फॉर ऑफिसिअल पर्पज असं म्हणतात ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.

तर आत्ता आपण ज्या भत्त्यांची माहिती घेतली या सगळ्याचा कर्मचाऱ्याच्या सॅलरी स्लिप मध्ये समावेश केला जातो आणि मग त्या रकमेवर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.

याशिवाय नोकरी करणाऱ्यांना काही रिटायरमेंट बेनिफिट आहेत ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.

रिटायरमेंट बेनिफिट

१) Voluntary Retirement म्हणजे स्वेच्छा निवृत्ती (आयकर कलम १०(१०सी) अंतर्गत)

तर स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास कर्मचाऱ्याला काही रक्कम मिळते त्यावर जास्तीत जास्त ५ लाखांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. म्हणजे ५ लाखांपेक्षा हि रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.

२) ग्रॅच्युइटी (आयकर कलम १०(१०) अंतर्गत)

ग्रॅच्युइटी च्या रकमेवर सुद्धा जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते.  म्हणजे २० लाखांपेक्षा हि रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.

३) Leave Encashment म्हणजे शिल्लक रजांवर मिळणारा मोबदला (आयकर कलम १०(१०एए) अंतर्गत)

हा मोबदला पैशांच्या स्वरूपात मिळतो. ज्यावर जास्तीत जास्त २५ लाखांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. म्हणजे २५ लाखांपेक्षा हि रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.

तर या होत्या सवलती ज्या तुमच्या उत्पन्नातून आधीच वजा केल्या जातात. म्हणजे हे सगळे प्रकार जे आत्ता आपण बघितले हे तुमच्या सॅलरी स्लिप मध्ये दिसतात पण ते एका मर्यादेपर्यंत करमुक्त असतात त्यामुळे त्यावर प्राप्तिकर लागू होत नाही आणि त्यामुळे ते वजा केल्यावर  मग उरतं तुमचं ढोबळ किंवा एकूण करपात्र उत्पन्न.

आता यानंतर येतात वजावटी.

नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या वजावटी

१) स्टॅंडर्ड डिडक्शन

मंडळी हि वजावट फक्त नोकरी करणाऱ्यांना किंवा पेन्शनर करदात्यांना मिळते जी नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत ७५ हजार रु एवढी मिळते. म्हणजे तुमच्या एकूण करपात्र उत्पन्नातून थेट ७५ हजार वजा केले जातात.

तर या होत्या काही सवलती आणि वजावटी ज्या नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांना नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळतात.

 

घराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न

यामध्ये उत्पन्नाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे घरभाड्यातून मिळणारं उत्पन्न यालाच लेट आऊट प्रॉपर्टी म्हणजे घर भाडेतत्वावर देणे असं म्हणतात.

यामध्ये ३ प्रकारच्या वजावटी मिळतात.

  • म्युनिसिपल टॅक्स,
  • ३०% स्टॅण्डर्ड डिडक्शन आणि
  • जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल तर त्याच्या ईएमआय मधलं जे व्याज असतं त्या व्याजाच्या रक्मेवर मिळणारी सवलत.

तर हि आकडेमोड कशी होते ते आपण बघू.

  • सगळ्यात आधी आपल्याला जे घरभाडं मिळतं त्यातून त्या घरासाठी चा जो टॅक्स असतो ज्याला आपण घरपट्टी म्हणतो ती रक्कम वजा केली जाते.
  • त्यातून उरलेल्या रकमेतून ३०% रक्कम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून वजा केली जाते. हे स्टँडर्ड डिडक्शन का मिळतं तर भाड्याने दिलेल्या घरात काही दुरुस्ती साठी किंवा असेच इतर खर्च केले जातात त्याची भरपाई म्हणून हि वजावट दिली जाते.
  • आणि तिसरी वजावट गृहकर्जाच्या ईएमआय मधलं जे व्याज असतं त्या व्याजाच्या रकमेची वजावट मिळते. मात्र ही वजावट घरभाड्याच्या रकमेतून घरपट्टी आणि ३०% स्टँडर्ड डिडक्शन कमी केल्यावर उरलेल्या रकमेएवढी मिळते.

घरभाड्याची रक्कम  ३,००,०००
(-) घरपट्टी (म्युनिसिपल टॅक्स) १०,०००
उर्वरित रक्कम २,९०,०००
(-) ३०% स्टॅण्डर्ड डिडक्शन ८७,०००
उर्वरित रक्कम २,०३,०००
(-) गृहकर्जाच्या ईएमआयमधील व्याज १,५०,०००
एकूण वजावट  ५३,०००


उदा.

जर तुम्हाला घरभाड्यापोटी एका आर्थिक वर्षात ३ लाख रु मिळत असतील. तर त्यातून समजा

  • घरपट्टी म्हणून १० हजार रु वजावट मिळेल. म्हणजे उरले २,९०,००० रु.
  • या २,९०,००० च्या ३०% स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. म्हणजे ८७ हजार रु. मग उरले २,०३,००० रु.
  • आता समजा तुमची गृहकर्ज घेतलं असेल ज्याचा ईएमआय तुम्हाला एका आर्थिक वर्षात २५०००० रु द्यावा लागतो.

आता या ईएमआय मध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात. तर त्यातली जी व्याजाची रक्कम असेल तेवढीच रक्कम वजा करता येईल ती समजा १५०००० रु आहे तर उरलेल्या २,०३,००० रु मधून १५०००० रु वजा केले जातील आणि उरलेली रक्कम म्हणजे ५३००० रु तुमच्या उत्पन्नामध्ये जोडले जातील आणि टॅक्स स्लॅबनुसार त्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.

मात्र जर इथं उरलेली रक्कम निगेटिव्ह मध्ये गेली म्हणजे या तीन वजावटीची बेरीज घरभाड्याच्या रकमेपेक्षा जास्त झाली तर मात्र त्या जास्तीच्या रकमेवर काहीहि वजावट मिळत नाही. म्हणजे ती रक्कम पुढील वर्षी कॅरी फॉरवर्ड होत नाही किंवा पुढील वर्षीच्या घरभाड्यातून सेट ऑफ सुद्धा होत नाही.

तर अशाप्रकारे घरभाड्यातून आपल्याला वजावटी मिळू शकतात.

Income From Business and Profession किंवा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न

मात्र हा प्रकार जास्त सखोलपणे बघावा लागतो म्हणून आपण तो या लेखा मध्ये बघणार नाही आहोत.

Income from Capital Gain

स्वतःच्या मालकीची मालमत्ता विकून मिळालेलं उत्पन्न ज्यामध्ये जमीन, घर, सोनं, चांदी, शेअर्स इत्यादींचा समावेश होतो. हा प्रकार सुद्धा जास्त सखोलपणे बघावा लागतो म्हणून आपण तोसुद्धा आपण यालेखा मध्ये बघणार नाही आहोत.

Income From Other Sources

म्हणजे वरील चार प्रकारांशिवाय इतर कुठल्याही मार्गाने मिळालेलं उत्पन्न

१) फॅमिली पेन्शन वरील वजावट

फॅमिली पेन्शन म्हणजे जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी एक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. या फॅमिली पेन्शनच्या वजावटीसाठी एक नियम आहे की

एका आर्थिक वर्षात मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमधील जास्तीत जास्त २५ हजार किंवा एक तृतीयांश (१/३) रक्कम यापैकी जे कमी असेल तेवढ्या रकमेची वजावट नवीन टॅक्स रेजिममध्ये मिळू शकते. 

उदा.
समजा एखाद्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन एका आर्थिक वर्षात २ लाख रु मिळते आहे. तर त्याच्या एक तृतीयांश म्हणजे ६६,६६७ रु होतात. त्यामुळे या बाबतीत २५ हजार एवढी वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळेल.

कारण फॅमिली पेन्शनवरील वजावटीच्या नियमानुसार २५ हजार किंवा फॅमिली पेन्शनच्या एक तृतीयांश (१/३) रक्कम यापैकी जे कमी असेल तेवढ्या रकमेची वजावट नवीन टॅक्स रेजिममध्ये मिळू शकते आणि इथे एक तृतीयांश रक्कम म्हणजे ६६,६६७ आणि २५ हजार यापैकी २५ हजार हि रक्कम कमी आहे. म्हणून २५ हजार एवढी वजावट मिळेल.

२) ५० हजार रु पर्यंत मिळालेल्या भेटवस्तू वरील वजावट

मंडळी समजा तुम्हाला कुणाकडून एखादी भेटवस्तू मिळाली तर त्यावर जास्तीत जास्त ५० हजार एवढी वजावट मिळते. मात्र हि भेटवस्तू ५० हजार पेक्षा १ रुपया जरी जास्त असेल तरी त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो.

३) नातेवाईकांकडून मिळालेल्या किंवा इतर भेटवस्तू वरील वजावट

जर तुम्हाला आता स्क्रिनवर दिसणाऱ्या पर्यायांद्वारे काही रक्कम किंवा भेटवस्तू मिळाली तर त्यावर एकही रुपया प्राप्तिकर भरावा लागत नाही. यामध्ये

  • नातेवाईकांकडून मिळालेली भेटवस्तू किंवा रक्कम
  • लग्नामध्ये मिळालेली भेटवस्तू किंवा रक्कम
  • कुणाच्या मृत्युपत्राद्वारे किंवा वारसाहक्काने मिळलेली इस्टेट
  • एखाद्या व्यक्तीने अगदी मृत्यूसमयी दिलेली काही इस्टेट, भेटवस्तू किंवा रक्कम
  • स्थानिक प्राधिकरण, युनिव्हर्सिटी, शैक्षणिक संस्था, एखाद्या फाउंडेशन आणि ट्रस्ट कडून मिळालेला निधी ज्याला आपण ज्याला आपण शिष्यवृत्ती म्हणतो

तर या सर्व रकमा, भेटवस्तू, इस्टेटी इत्यादी सर्व गोष्टी पूर्णपणे करमुक्त आहेत.

तर या होत्या वेगवेगळ्या उत्पन्नावर मिळणाऱ्या सवलती. आता बघूया काही वजावटी.

४) एनपीएस मध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील वजावट

जर तुम्ही एनपीएस मध्ये खातं सुरु केलं असेल आणि जर तुमच्या कंपनीकडून त्यात काही रक्कम भरली जातं असेल तर त्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकरात वजावट दिली जाते.

हा मुद्दा नीट लक्षात घ्या की तुम्ही एनपीएस मध्ये जी रक्कम भरता त्यावर वजावट मिळत नाही तर तुमच्या कंपनीकडून जी रक्कम तुमच्या एनपीएस खात्यात भरली जाते त्यावर हि वजावट दिली जाते.

हि वजावट आयकर कलम ८०सीसीडी(२) अंतर्गत दिली जाते आणि या वजावटीची मर्यादा तुमच्या (बेसिक सॅलरी + डियरनेस अलाउन्स) च्या १४% एवढी करण्यात आली आहे.

म्हणजे तुमच्या (बेसिक सॅलरी + डियरनेस अलाउन्स) च्या जास्तीतजास्त १४% एवढी रक्कम तुमच्या कंपनीकडून तुमच्या एनपीएस खात्यात भरली गेल्यास त्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत मिळते.

तुमची कंपनी एनपीएस मध्ये तुमच्या नावाने पैसे भरते का हे तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपमधून कळू शकतं.

५) अग्निवीर कॉर्पस फंड मध्ये भरलेल्या रकमेवरील वजावट

मंडळी, जर तुम्ही अग्निवीर कॉर्पस फंडामध्ये काही रक्कम दिली असेल तर त्यावर सुद्धा वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत दिली जाते. ही वजावट संपूर्ण रकमेवर दिली जाते. म्हणजे तुम्ही अग्निवीर कॉर्पस फंडामध्ये जी काही रक्कम द्याल त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत वजावट दिली जाते.

अग्निवीर योजना म्हणजे काय?

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय तरुणांसाठी ही योजना आणली आहे ज्याद्वारे निवड झालेले तरुण भारतीय सशस्त्र दलात सामील होऊ शकतात. या योजनेचे नाव अग्निपथ आहे आणि या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला अग्निवीर म्हणून ओळखले जाते.

ते सशस्त्र दलात एका वेगळ्या पदावर असतील, इतर कोणत्याही विद्यमान पदांपेक्षा वेगळे असतील. या अग्निवीरांना सरकारने अनेक फायदे दिले आहेत जसे की अपंगत्व आल्यास भरपाई, मृत्यूनंतर भरपाई आणि प्राप्तीकरामध्ये सवलत.

तर अशा प्रकारे या अग्नीवर योजनेसाठी सरकार एक फंड उभा करतं ज्यामध्ये लोक ऐच्छिक रक्कम दान करू शकतात आणि ही दान केलेली रक्कम पूर्णपणे करातुन सवलतीसाठी पात्र ठरते. आणि अग्निवीर कॉर्पस फंड मध्ये भरलेल्या रकमेवर मिळणारी ही सवलत आयकर कलम ८०सीसीएच(२) अंतर्गत दिली जाते.

तर मंडळी, या होत्या नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी ज्यांचा उपयोग करून तुम्ही नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मोठ्या प्रमाणावर टॅक्स मध्ये बचत करू शकता. तेव्हा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद.